जळगाव : पुस्तकांशी मैत्री व्हावी...रुची-अभिरुची संस्कारित व्हावी...पुस्तकं विकत घेऊन वाचनाची सदाचारी सवय रुजावी आणि वाचन चळवळीला गती मिळावी... यासाठी 'परिवर्तन' संस्थेने 'पुस्तक भिशी' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला वाचनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन लागले आणि सर्वचं व्यक्ती घरात अडकली. अनेक दिवसांपासून घरातचं राहिल्यामुळे नागरिकांना वेळ घालविणेही कठीण झाले. बैैठे खेळ, टीव्ही, मोबाईल हे किती वेळ खेळत बसणार हा प्रश्न. अशा परिस्थितीत वाचन चळवळ दृढ व्हावी आणि नागरिकांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी परिवर्तनचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी पुस्तक भिशीची संकल्पना मांडली व राबविली. रंगकर्मी मंजुषा भिडे व साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे हे या उपक्रमाचे प्रमुख आहे. सर्व आर्थिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी उत्स्फूर्तपणे हेमंत भिडे यांनी घेतली आणि या उपक्रमाला सुरूवात झाली.
आणि...निवडला जातो भिशी विजेता..
या उपक्रमातंर्गत दर महिन्याला दोनशे रूपये प्रत्येकी जमा होतात. १२ सहभागी सदस्यांचा एक ग्रुप असून त्यातील एकाची निवड भिशी विजेता 'भाग्यवान वाचक' या दृष्टीने करण्यात येते. आतापर्यंत तीन पुस्तक भिशी तयार झाले असून आणखी एक भिशी गट प्रस्तावित आहे. महिन्यातील पहिल्या रविवारी सहभागी सदस्यांची आॅनलाईन भेट होते. त्यावेळी चिठ्ठ्या टाकून वाचकांची निवड करण्यात येते. तसेच वाचन समृद्धी अनुभवलेल्या जाणत्या व्यक्तिमत्त्वांचे या विषयावर विवेचन आयोजित केले जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांनी प्रथम पुष्प गुंफले तर दुसरे पुष्प ज्येष्ठ अभिनेते, लेखक व अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी गुंफले. या रविवारी ऑनलाईन झालेल्या भिशीत सोनाली पाटील यांनी डॉ.भालचंद्र नेमाडे लिखित 'बिढार' कादंबरीवर आणि डॉ.स्नेहल पाटील यांनी ' नॉट विदाऊट माय डॉक्टर,' या पुस्तकांवर विवेचन केले. जुलै महिन्यातील पहिल्या रविवारचे 'भाग्यवान विजेते ' तीन भिशी सदस्य आहेत. उदय सपकाळे, जयश्री पाटील आणि शंभू पाटील हे तीन भाग्यवान विजेते असून त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर तिघेही वाचकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
त्या रक्कमेतून विकत घेतली जातात केवळ पुस्तकचं
भिशीतून प्राप्त रकमेतून फक्त पुस्तकच विकत घेतली जातात. 'मला आवडलेलं पुस्तक' यावर भिशी विजेते आपले विचार व्यक्त करतात. भिशीचा उद्देश फक्त पुस्तक विकत घेणे एवढाच नव्हे तर ती पुस्तक वाचून त्यावर बोलणे, ती पुस्तकं इतरांना उपलब्ध करून देणे, विचारांसोबत पुस्तकांचही आदान प्रदान होत राहणे हा सुद्धा आहे, अशी माहिती कलावंत हर्षल पाटील यांनी दिली. आता पर्यंत या योजनेत ३६ वाचक सहभागी झाले असून एकत्रित ७ हजार २०० रूपये रक्कमेची पुस्तके प्रत्येक महिन्याला सध्या विकत घेतली जातात. पुढील महिन्यात आणखी दोन पुस्तक भिशी प्रस्तावित आहेत.