जळगाव : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तंबीनंतर अखेर खड्डेमय बनलेल्या औरंगाबाद जळगाव महामार्गाची दुरुस्ती सुरु झाली आहे. गेले अनेक दिवस या महामार्गातील खड्ड्यांमुळे प्रवास करणे जिकरीचे झाले होते..राज्यभरात खड्ड्यांनी रस्ते वेढलेले असताना औरंगाबाद-जळगाव महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. या मार्गावरील वाहतूक ठप्प होईल की काय? अशी स्थिती होती. या दोन जिल्ह्यांमध्ये प्रवास करताना जीव मुठीत धरून आणि एकदम हळू प्रवास होत होता.अनेकवेळा विनंती करूनही कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. गडकरी यांनी २ नोव्हेंबरला औरंगाबाद-सिलोड-जळगाव या महामार्गाची पुढील ८ दिवसात दुरुस्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता, बांधकाम विभाग आणि रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला दिले होते. गडकरी यांच्या टिष्ट्वटला ४ हजार ६०० लोकांनी उत्तर दिले होते. त्यांच्या आदेशानंतर कामाला वेग आला असून याबाबत स्वत: नितीन गडकरी यांनी टिष्ट्वट करत माहिती दिली. सध्या महामार्ग दुरुस्तीचे काम वेगात सुरु आहे.महामार्गाचे तीन टप्प्यात४यापूर्वीच्या एजन्सीकडून काम रखडल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने तीन एजन्सी नेमल्या असून या महामार्गाचे तीन टप्प्यात काम करण्यात येणार आहे. औरंगाबाद ते सिलोड, सिलोड ते फर्दापूर आणि फर्दापूर ते जळगाव रोड अशा तीन विभागांचे काम तीन एजन्सीज्ना आॅक्टोबर महिन्यात देण्यात आले आहे.अर्धे राज्य खड्ड्यांनी बेजार असताना औरंगाबाद-जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची तर खड्ड्यांनी चाळण झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी, पावसामुळे पाणी भरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे तर या रस्त्यावर मोठमोठी तळी साचली होती. पाणी साचलेल्या तळ्यामुळे खड्डा किती खोल आहे, हेही दिसून येत नव्हते. २७ आॅक्टोबर रोजी तर हा महामार्ग जवळपास १.३० तास ठप्प होता. दोन्ही बाजूला सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.याच मार्गावर वाकोद-पाहूर दरम्यान काम थंडावलेले असल्याने २ नोव्हेंबर रोजी पावसामुळे एवढा चिखल रस्त्यावर आला होता की, एस. टी.ही या चिखलात फसून गेली होती. यावेळीही दीड तास वाहतुक बंद होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या.गडकरी यांनी औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामात लक्ष घालून आदेश दिल्यानंतर आता नेटिझन्सनी टिष्ट्वटचा पाऊस पाडत राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती देत या रस्त्यांची कामेही त्वरित पूर्ण करण्याबाबत विनंती केली आहे.
गडकरींच्या तंबीनंतर रस्त्याच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:47 PM