लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली असून, जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या बायपासचे काम देखील आता वेग धरू लागले आहे. आव्हाणे परिसरातील गिरणा नदीवर होत असलेल्या बायपासच्या पुलाचे काम देखील आता तीव्र गतीने सुरू झाले आहे. पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे हे काम थांबण्या आधीच या ठिकाणी पिलर गाडण्याचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
पाळधी ते तरसोद पर्यंतच्या २३ किमीचा हा बायपास मार्ग होणार असून, गेल्या पाच वर्षांपासून हे काम रखडले होते. मात्र गेल्या सात महिन्यांपासून या कामाला गती आली असून, पाळधी , आव्हाने, ममुराबाद शिवारा पर्यंत या कामाला चांगलीच गती आली आहे. दरम्यान, या बायपास अंतर्गत गिरणा नदीवर देखील पुल बांधण्यात येत असून, पावसाळ्यात गिरणा नदीला पूर आल्यास या पुलाचे काम देखील थांबू शकते. यामुळे नदीला पूर येणे अगोदरच जेवढे शक्य होईल तेवढे काम वेगाने करण्यावर ठेकेदाराकडून प्रयत्न केले जात आहेत. पूलासाठी लागणारे पिलर तयार करून ते गाडण्याचे काम सुरू असून, पुढील काम पावसाळ्यानंतर सुरू होईल अशी शक्यता आहे.
पुलाची लांबी - ३२० मीटर
रुंदी - ३३ मीटर
अंदाजे खर्च - १०० कोटी
ठेका - ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर , इंदूर
मुदत - १८ माहिने
आतापर्यंत झालेले काम - २० टक्के