जळगाव/भुसावळ : यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ विभागाला नवीन असे काही मिळाले नसले तरी जुन्या प्रकल्पांना प्राध्यान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी ६०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या रेल्वे मार्गांच्या कामाला गती मिळणार आहे, तर मेमू कारशेडसाठी दुसऱ्यांदा निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. रेल्वे बोर्डाकडून पिंक बुक प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्य व केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पॅसेंजर गाड्या व साधारण तिकिटांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेचे ट्रॅफिक सिग्नल अद्ययावत करण्यात येणार आहे.
पी.जे. गाडी ब्रॉडगेज
पाचोरा-जामनेर (पी.जे) दरम्यान धावणाऱ्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी गती मिळणार आहे. शिवाय जामनेर ते बोदवड व पुढे मलकापूर दरम्यान स्वतंत्र किंवा आहे त्याच मार्गावर नवीन रुळाचे विस्तारीकरण करण्यासंदर्भातील दोन्ही प्रस्ताव विचाराधीन आहेत. या मार्गावर जामनेर ते बोदवडपर्यंत नवीन मार्ग होणार आहे. दरम्यान, गत फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आलेल्या बडनेरा, अमरावती-नरखेड
मार्गावर धावणाऱ्या मेमू गाडीचे डबे आठवरून बारापर्यंत करण्याचे विचाराधीन आहे. पूर्वी विभागात चार मेमू कार्यान्वित होत्या, आता मात्र १२ मेमू आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार आहे.
भुसावळ- खरगपूर कॉरिडॉर होणार असल्यामुळे भुसावळ विभागातील वाहतूक वाढणार आहे. त्याची गती सध्या ११० असून, ती १३० कि.मी. प्रति तास वाढविण्याचे नियोजन आहे. भुसावळ येथील प्रस्तावित रेल नीर प्रकल्प हा आयआरसीटी अंतर्गत आहे. यामुळे त्याबाबत रेल्वे बोर्डाकडून अद्याप स्पष्टीकरण करण्यात आले नाही.
तिसऱ्या व चौथ्या लाईनच्या कामाला मिळणार गती
गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर असलेल्या भुसावळ विभागातील जळगाव विभागातून-मनमाड तिसरा मार्ग तसेच भुसावळ -जळगाव चौथा मार्ग याशिवाय भुसावळ विभागातून मंजूर असलेले रेल्वे ओव्हरब्रिज मेंटेनन्स कार्य विद्युतीकरण, हायटेक स्टेशन प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदा प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वे नीर प्रकल्पाबाबत कुठलीही माहिती नाही
रेल नीर प्रकल्प आयआरटीसीमार्फत उभारण्यात येणार आहे, भुसावळ विभागात आयआरटीचा स्वतंत्र कुठलाही विभाग नाही,त्यामुळे हा प्रकल्प का रखडला आहे, याबाबत सद्य:स्थितीला भुसावळ विभागाकडे काहीही माहिती नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
मनमाड -जळगाव तिसऱ्या मार्गासाठी २०० कोटींचा निधी
यावेळी गुप्ता यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मनमाड -जळगाव तिसऱ्या मार्गासाठी २०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले. तर जळगाव ते भुसावळ या चौथ्या रेल्वे मार्गासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचेही सांगितले. दरम्यान, यंदा जळगाव ते भुसावळ या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम मार्चअखेर पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.