चुंचाळे, ता.यावल : वड्री शिवारातील राखीव वनजमिनीवरील धरणात आदिवासी तरुणांना मत्स्य पालन उद्योगाला परवानगी मिळावी, अशी मागणी आहे. याबाबतचा ठराव संबंधित ग्रामपंचायतीने केला आहे. मात्र, दोन वर्षांपासून यावरील निर्णय वनखात्याकडे प्रलंबित आहे. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बेरोजगार आदिवासी तरुण बांधवांना मत्स्य उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातून वड्री ग्रामपंचायतीच्या आमसभेने मंजूर केलेल्या ठरावाला वनविभागाने केराची टोपली दाखविल्याने परिसरातील आदिवासी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
या संदर्भात वृत्त असे की, वड्री ता.यावल या गावाजवळ असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी न विभागाच्या कम्पार्टमेंट क्रमांक ८१ मध्ये वड्री धरण असून, या धरणातून वड्री परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने वड्री ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव यांनी दिनांक २६/ ०१/ २०२० रोजी झालेल्या आमसभेत संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी सुचविलेल्या प्रमाणे गावाच्या क्षेत्रात काम्पार्टमेंट क्रमांक ८१ या राखीव वनात असलेल्या धरणात मत्स्यपालन उद्योग करता येईल व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होईल, या दृष्टिकोनातून सर्वानुमते मंजुरीचा ग्रामसभेचा ठराव संबंधित कार्यालयाकडे पाठविला आहे.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने आदिवासी काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष बशीर परमान तडवी यांनी यावल पूर्वच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दिला आहे, परंतु वनविभागाकडे हा प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून अद्यापही प्रलंबित आहे. यामुळे अनेक आदिवासी तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटले जात असून, याविषयी वनविभागाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू, प्रसंगी राज्याच्या वनमंत्री यांच्याकडेही लिखित स्वरूपात तक्रार करणार असल्याचे बशीर तडवी यांनी म्हटले आहे.