जळगाव - राज्यातील दुष्काळी परिस्थितीत टंचाईचे संकट दिवसेंदिवस बिकट होत असताना या टंचाईच्या परिस्थितीत राज्यातील कुठल्याही एका जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व चारा तसेच छावण्या उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी दि. महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई यांनी स्वीकारावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
गोलाणी मार्केट येथे आज महाराष्ट्र राज्य को. ऑप बॅक मर्यादित, मुंबई च्या ४९ व्या जळगाव येथील नवीन शाखेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकात पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख होते. तर प्रमुख अतिथी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, समिती सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे, डॉ. अजित देशमुख आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 4 वर्षापूर्वी बँकांची परिस्थिती वेगळी होती. आज शिखर बँकेने 30 हजार कोटीपर्यंत व्यवसाय केला असून बँक प्रगतीचे वेगवेगळे शिखर गाठीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य सहकारी बँकेने ठरविले तर राज्यातील 4 हजार कृषी मंडळात ते फ्रुट प्रोसेसिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकतात. या उद्योगातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला पैसा मिळेल. लोकांना रोजगार उपलब्ध होईल व छोट्या उद्योगांना चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या भाषणात राज्याचे सहाकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, शिखर बँकेने ग्रामीण भागात बँकाचे जाळे पसरवून नाविन्यपूर्ण शाखा कार्यान्वित कराव्यात. राज्यात सहकार क्षेत्र समृद्ध होत नाही तो पर्यंत महाराष्ट्र राज्य अधिक समृद्ध होणार नाही. यासाठी शासन व सर्वसामान्य माणसांनी सहकार्याची करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील १ हजार ८०० वेगवेगळ्या संस्थाना शासकीय मदत न देता त्या समृद्ध झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्यात ४ लाख बचतगट असून या बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या मालाची विक्रीची समस्या सुटणार आहे. बचत गटांतील महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण शिखर बॅकेच्या सहकार्याने दिले तर फार मोठी उपलब्धी होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सहकार मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, शिखर बँकेने सर्व सहकारी संस्थाना सदस्य करुन राज्यातील ४ लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यातून राज्याचे सहकार क्षेत्र खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. राज्यातील अनेक पतसंस्था डबघाईला आल्या असून ठेवीदारांनी आकर्षक व्याज देणाऱ्या पतसंस्थापासून सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करुन देणे ही बँकांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. एक ही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता बॅंकांनी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात वेगवेगळया पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवींचा प्रश्न गंभीर असून 400 कोटी रुपयांच्या ठेवी ठेवीदारांनी पतसंस्थांच्या भरोसावर ठेवल्या असून त्यातील काही पतसंस्था डबघाईस आल्यामुळे ठेवीदारांचे मोठे नुकसान झालेले आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी व पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी सहकार विभागाचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देवून सहकार्य करावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर बॅंकेविषयी माहिती देताना म्हणाले की, प्रत्येक शहरात शिखर बॅंकेची एक शाखा आवश्यक असून शाखा उघडण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बॅकेच्या संचालक मंडळाने बॅंकेच्या धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. बॅंकेमार्फत शेतकरी, गरीब माणसाला मोठ्या प्रमाणात मदत करता येईल यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्य सहकारी बॅंकेला 400 कोटी रुपयांचा नफा मिळल्याचेही त्यांनी सांगितले. बॅंक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशाकडे वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.