जळगाव - जिल्ह्यातील फैजपूर येथे आठवडे बाजारासाठी जाणार्या दोन पिकअप व्हॅनला भुसावळकडून येणार्या ट्रकने ओव्हरटेक करतांना समोरून धडक दिल्याने चार जण भादली रेल्वे उड्डाणपूलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाल्याची भीषण घटना बुधवारी पहाटे ६.५० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले असून दहा जणांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात तर दोन जणांवर खासगीत उपचार सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फैजपूर येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात बकरी खरेदी-विक्री केली जाते. याच व्यवसायासाठी भडगाव येथून एमएच-४३ बीबी ००५० आणि जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) येथून एमएच-४३ एडी १०५१ ह्या दोन्ही पिकअप व्हॅन फैजपूरकडे जात होत्या. या दोन्ही व्हॅनमध्ये १६ जण सहा ते सात बकर्यांसह प्रवास करीत होते. सकाळी ६.५० वाजेच्या सुमारास ट्रक क्र. एमएच ०९ एचजी ९५२१ हा भुसावळकडून येत होता. भादली रेल्वे उड्डाणपूलाजवळ या ट्रकने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणार्या एमएच ४३ बीबी ००५० या पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या पिकअप व्हॅनच्या ट्रालात बसलेले नईम अब्रांहम खाटीक (रा. तांबापुरा, वय ६५), अकील गुलाब खाटीक (रा. फैजपूर, वय ५६), फारूख खाटीक (रा. भडगाव, वय ४५), जुनेद सलीम खाटीक (रा. भडगाव, वय १८) हे चारही जण अक्षरश: पूलावरून खाली फेकले गेले. जमिनीपासून ७० ते ८० फुट खाली पडल्याने चारही जण जागीच ठार झाले. पहिल्या व्हॅनला धडक दिल्यानंतर ट्रकने पिकअप व्हॅनच्या मागून येणार्या एमएच ४३ एडी १०५१ या दुसर्या पिकअप व्हॅनलाही धडक दिली. या अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अशी आहेत जखमींची नावे या अपघातात ट्रकचालक वसंत रामहरी देऊळकर (रा. अकोला, वय ५५), पिकअप व्हॅन चालक रसूल कुरेशी (रा. भडगाव), दुसरा पिकअप व्हॅन चालक प्रकाश पंढरीनाथ शिंदे (रा. पळासखेडा मीराचे, वय ४३), संतोष दौलात धनगर (रा. नेरी, वय ६०), सलीम गुलाब खाटीक (रा. नशिराबाद, वय ५०), मुश्ताक हाजी बिस्मील्ला (लोहारा ता. पाचोरा, वय ४७), अब्दुल रज्जाक खाटीक (नशिराबाद, वय ४६), हनिफ खाटीक (वय ४०), लियाकत बाबु खाटीक ( वय ४८), शे. सलीम शे. मेहबुब खाटीक (रा. भडगाव, वय ४६), शाकीर खाटीक, इरफान खाटीक, जुबेर खाटीक हे जखमी झाले आहेत. यातील ११ जण डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार घेत असून दोन जण खासगी रूग्णालयात रवाना झाले आहे.
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी अपघाताची माहिती मिळताच मयत आणि जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात गर्दी केली होती. यावेळी घटनास्थळी नशिराबादचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनीही पाहणी केली. उपचारकामी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित गुप्ता, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, रूग्णालय व्यवस्थापक एन.जी. चौधरी, जितेंद्र चौधरी यांनी सहकार्य केले.