आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - धुळे येथून जळगावकडे येत असताना जि.प.चे निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. पंडित शंकर डोळे (६५, रा. रायसोनीनगर, जळगाव) यांच्या कारला टँकरने धडक दिल्याने डॉ. डोळे यांच्यासह त्यांच्या पत्नी यमुनाबाई पंडित डोळे (६३) हे दाम्पत्य जखमी झाले. हा अपघात १८ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील धारागीरजवळ महामार्ग क्रमांक सहावर झाला. जखमींवर जळगावात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला.डॉ. डोळे हे पत्नीसह धुळे येथे त्यांच्या मुलीकडे गेलेले होते. तेथून रविवारी दुपारी जळगावकडे कारने (क्र. एम.एच. १९, बीजे - ८८४७) येण्यास ते निघाले. त्या वेळी ते धारागीरजवळ आल्यानंतर त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या टँकरने (क्र. जी.जे. १६, एयू २८८६) जोरदार धडक दिली. यामध्ये डॉ. डोळे यांच्या डोक्याला व त्यांच्या पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्या वेळी त्यांना १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृत्ती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. धडक देणारा टँकर घटनास्थळी उभा असून कार एरंडोल पोलीस ठाण्यात आणण्यात आली.एअर बॅगमुळे अनर्थ टळलाअपघातात कारची चालकाकडील बाजूचा चुराडा झाला असून एअर बॅगमुळे अनर्थ टळल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.डॉ. डोळे हे बेशुद्ध असल्याने अपघात नेमका कसा झाला या बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. त्यांना जळगावात आणल्यानंतर त्यांची पुतणी रुग्णालयात पोहचली.डॉ. डोळे हे जि.प.मध्ये अतिरिक्त आरोग्य अधिकारी होते व त्यानंतर ते आरोग्य अधिकारी झाले. या दरम्यान त्यांनी जळगाव व बुलडाणा जि.प.मध्ये काम पाहिले. निवृत्त झाल्यानंतर ते जळगावातील रायसोनीनगर येथे राहतात. त्यांचा मुलगा दुबई येथे असून एक मुलगी धुळे व दुसरी मुलगी पुणे येथे आहे.
जळगावचे निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. डोळे यांचा महामार्गावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:41 PM
पती-पत्नी जखमी
ठळक मुद्देधारागीरजवळ टँकरची कारला धडकटँकर चालक फरार