लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी एक वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. यात सभासदांसाठी २५ लाख रुपयांचा अपघात विमा काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तर लिपिक रवींद्र मोरे यांच्यावर झालेल्या कारवाईवरून खडाजंगी झाली.
माध्यमिक पतपेढीची ऑनलाईन सभा रविवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत १८ विषयांना मंजूरी देण्यात आली. अडीच वाजेपर्यंत सभा चालली. यात ३०४ सभासदांनी सहभाग नोंदविला होता. अशी माहिती अध्यक्ष शालीग्राम भिरूड यांनी दिली.
मोरे यांच्या निलंबनावरून विचारला जाब
ऐन वेळेच्या प्रश्नांमध्ये डॉ.मिलींद बागुल यांनी लिपिक रवींद्र मोरे यांच्यावरील कारवाईबाबत पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरूड यांना विचारणा केली. यावर कार्यालयात येऊन भेटा तुम्हाला माहिती देऊ, असे अध्यक्षांनी सांगितले. मोरे यांची नेमकी चूक काय त्यांनी पदोन्नती मागणे आणि अन्यायाविरोधात आवाज उठविणे हा गुन्हा आहे का? यासह चौकशी समितीत ज्यांच्यावर आरोप आहे त्यांनाच अध्यक्ष करण्यात आले आहे. शिवाय नेमलेल्या त्रिस्तरीय समितीतील दोन सदस्यांनी दिलेल्या अहवाला जर मोरे यांनी चूक केली असेल तर सौम्य शिक्षेची तरतूद केलेली आहे. असे असताना चौदा महिने बाकी असताना मोरे यांच्यावर कारवाई का? करण्यात आली. याबाबत डॉ. बागुल यांनी सभेत विचारणा केली. यानंतर काही वेळातच आभार प्रदर्शन करून सभा संपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोट
ही बैठक अहवालावर चर्चा करण्यासाठी असते. मोरे यांच्या प्रकरणात चौकशी समिती नियुक्त केली असून त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. चौकशी समितीचा मोठा अहवाल बैठकीत कसा सांगणार त्यामुळे डॉ. मिलिंद बागुल यांनी माहिती मागितल्यानंतर त्यांनी पतपेढीत यावे, आम्ही माहिती देऊ, असे आम्ही सांगितले. - एस. डी. भिरूड, अध्यक्ष माध्यमिक पतपेढी