पाचोरा : शहराला मुख्य बाजारपेठेशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग अपघातांचे माहेरघर ठरत असून नित्य नियमाने या भुयारी मार्गात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे.जुने पाचोरा शहर आणि नवीन लोकवस्तला जोडण्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे रेल्वे गेट होते. तासनतास नागरिकांना या ठिकाणी थांबावे लागायचे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असे. म्हणूनच २००८-०९ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नगरपालिकेच्या माध्यमातून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. परंतु पाचोरावासीयांसाठी सुविधा म्हणून बनविलेला हा भुयारी मार्ग त्रासदायक ठरत आहे.या भुयारी मार्गाच्या बाजूच्या भिंतींमधून पाणी सतत झिरपत राहते. भुयारी मार्गाच्या बाजूला पाणी निघून जाण्यासाठी जी व्यवस्था असायला हवी होती ती नसल्यामुळे हे पाणी मुख्य रस्त्यावर वाहून येते. त्यात माती मिसळल्याने चिखल तयार होऊन दुचाकी, लहान चारचाकी वाहने चालवितांना कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर कधी कधी चक्क वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यानंतर बाजूच्या भिंतींमधून सतत झिरपत असणारे पाणी ही मोठी समस्या ठरली आहे. या साचलेल्या पाण्यात बारीक वाळू आणि चिखल यांचे मिश्रण असल्याने दुचाकी वाहने घसरून सातत्याने अपघात घडत आहेत. अनेकांना अपघात झाल्याने अपंगत्व आले आहे.या भुयारी मार्गाच्या पलीकडे महत्त्वाच्या शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि नवीन लोकवस्ती असल्यामुळे या मागार्तून असंख्य वाहनांची रोज ये-जा असते. शाळकरी मुले, महिलांना या मार्गावर अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. यातून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व भोगावे लागत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.