पारोळा, जि.जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आपल्या गावी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे जात असताना टेम्पोचा रॉड तुटल्याने अपघात होऊन त्यात वाहनातील सर्व २२ मजूर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी अडीचला आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर विचखेडे, ता.पारोळा गावाजवळ घडली. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.सूत्रांनुसार, मुंबईत बांधकाम व्यावसायिकाकडे मजूर म्हणून सुलतानपूर (उत्तर प्रदेश ) येथील २२ जण कामाला होते. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ते दीड महिन्यापासून अडकून पडले होते. हाताला काम नाही. खाण्याचे वांधे होत असल्याने त्या सर्वांनी गाव सुलतानपूर येथे जाण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यांना गावाकडे परत जाण्यासाठी पास देण्यात आला होता. ९ रोजी ते मुंब्रा येथून टेम्पो (एमएच-०४-पीपी-४७९१) ने सकाळी १० वाजता निघाले.दुपारी अडीचला आशिया महामार्ग ४६ वर विचखेडे, ता.पारोळा गावानजीक टेम्पोचा रोड तुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उतरून उलटली त्यात २२ जण जखमी झाले. या सर्वांना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यात ३ जणांचे जणांचे हात मोडले, तर २ जणांचे पाय इतर ८ जणांना डोक्याला मार लागला आहे. तसेच ९ जणांना मुका मार लागला आहे. या सर्वांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे, डॉ.सुनील पारोचे, डॉ.निखिल बोहरा यांनी प्राथमिक उपचार करून धुळे सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.अपघातातील जखमीअमरनाथ पाल (२२), जयप्रकाश यादव (३२), कृष्णाशंकर काळू पाल (३१), संजयकुमार (२५), रिया शिवशंकर पाल (१८), विष्णू पाल (२३), लक्ष्मी संतोष पाल (३०), शकील रफिक (४४), महंमद सलमान (१७), संतोष चैत्राम चव्हाण (३०), यश पाल (३३), सूरज चव्हाण (१४), रामकुमार पाल (२४), दिनेशकुमार पाल (२०), कंपन पाल (३२), िशव पाल (४६), विकास ओमप्रकाश पाल (२२), अनु श्यामकांत पाल (४५), राम आचरे (५०), विकास पाल (२०), सलमान खान (१७) आदी जखमी झाले आहेत. सर्व जखमी हे सुलतानपूर येथील रहिवासी आहेत.