Chandrakant Patil ( Marathi News ) : मुक्ताईनगर मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात पाटील हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांची गाडी त्यांच्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला असून पाटील यांच्यासह तीन सुरक्षारक्षकही अपघातात जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह मुक्ताईनगरहून जुना कुंड रस्त्यावर प्रवास करत होते. मात्र वाटेत काही शेतकरी आमदार पाटील यांची वाट पाहात थांबले होते. या शेतकऱ्यांना पाहताच पाटील यांनी आपल्या वाहनचालकाला गाडी थांबवण्याच्या सूचना केल्या. मात्र पाटील यांची गाडी थांबताच त्यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षारक्षकांच्या गाडीला ब्रेक न लागल्याने ती गाडी थेट पुढच्या वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात चंद्रकांत पाटील यांना किरकोळ जखम झाली आणि तीन सुरक्षारक्षकही जखमी झाले. पाटील आणि इतर जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख असलेल्या चंद्रकांत पाटील २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तेव्हा भाजपमध्ये असलेले आणि सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असलेल्या एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले, त्यांनी भाजपच्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचा १ हजार ९८९ मतांनी पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेत चंद्रकांत पाटील यांना समर्थन दिले होते.