सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण प्रकाश महाजन व त्याचा मावसभाऊ चंद्रकांत अशोक पाटील असे दोघं जण दुचाकीने जळगाव येथे शेतीचे साहित्य घेण्यासाठी आले होते. जळगाव येथील काम आटोपून घराकडे परतत असताना, मन्यारखेडा फाट्याजवळ समोरून भरधाव वेगात येणारी चारचाकी ओव्हरटेक करताना दुचाकीवर आदळली. त्यात किरण व चंद्रकांत दोघं जण फेकले गेले. किरण याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
२ मे रोजी झाला विवाह
किरण याचा २ मे रोजी वाघोदा, ता.रावेर येथे कांचन हिच्याशी विवाह झाला होता. किरण हा शेतीचे काम करीत होते. मनमिळावू स्वभाव, बोलकं व्यक्तिमत्त्व म्हणून किरण सर्वांना परिचित होता. त्याच्यापश्चात पत्नी, आई मंदाबाई, वडील प्रकाश आत्माराम महाजन, भाऊ शैलेश व वहिनी असा परिवार आहे. घटनेचे वृत्त कळताच, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, मावस बहीण तथा महिला पोलीस कर्मचारी वैशाली पाटील यांच्यासह गावातील मित्रपरिवाराने रुग्णालयात धाव घेतली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार अनमोल पटेल यांनी पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण करून रात्री ८ वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.