प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद : सामाजिक व धार्मिक एकात्मतेचे दर्शन व सहिष्णुतेचे प्रतीक असलेल्या नशिराबाद येथील अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाला ३२ वर्षांची अखंड परंपरा असून नशिराबादसह पंचक्रोशीतील भाविक या महोत्सवात तल्लीन होऊन भक्तीचा आनंद घेतात. शेकडो महिला पुरुष व पारायण वाचन करीत आहे. या उत्सवाला ग्रामोत्सव किंवा लोकमहोत्सव म्हणून संबोधले जाते.नशिराबादला पूर्वी वाड्यावाड्यात भागवत कथा सप्ताहाचे आयोजन होत होते. एक गाव एक कथा सप्ताह व्हावा, या उद्देशाने वैकुंठवासी सुरेश महाराज यांच्या पुढाकाराने तत्कालीन सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत गाव सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली. सन १९८१मध्ये या उत्सवाची सुरुवात झाली. विठ्ठल मंदिरात वैकुंठवासी सुरेश महाराज यांनी प्रथम या महोत्सवाला सुरुवात केली.गावात गीतेचा प्रचार व प्रसाराचे धर्म जागृतीचे कार्य त्यांनी केले. अध्यात्माची गोडी वृद्धिंगत झाल्याने नशिराबादला हजार महिलांच्या मुखी भगवद्गीता तोंडीपाठ झाली. पारायण सोहळाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आठवडा बाजाराच्या प्रांगणात पारायण सोहळा महोत्सव सन १९८७पासून बहरला. त्या दिवसापासून ही गौरवशाली परंपरा आजतागायत सुरू आहे, अशी माहिती ज्येष्ठ वारकरी मिठाराम पाटील व सामाजिक कार्यकर्ते गणपत सोमा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सामूहिक पारायण वाचनाची मुहूर्तमेढ सुरेश महाराजांनी केली. त्यांना भरत महाराज यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची साथ मिळाल्याने महोत्सवाची रंगत वर्षागणिक वाढत गेली व पंचक्रोशीतील भाविक यात तल्लीन होऊ लागले. विद्यार्थ्यांना धार्मिकतेची ओढ लागावी व संस्कृतीची जपणूक व्हावी, यासाठी भगवद्गीता विविध सूक्तचे पठाणाची उपक्रम स्पर्धा घेण्यात येते. गतवर्षी सामाजिक कार्यकर्ते गणपत सोमा पाटील यांनी या महोत्सवाचा संपूर्ण खर्च करून एक नवा आदर्श पायंडा निर्माण केला.महिलांची लक्षणीय उपस्थितीपारायण वाचनाला महिलांची लक्षणीय उपस्थिती असते. बोचºया व अंगाला झोंबणारा वाढत्या थंडीतही महिला-पुरुष भाविक उत्साहात उपस्थित राहून पहाटेला काकडआरती, पारायण वाचन व रात्री कीर्तन श्रवणाचा लाभ घेत आहेत. यंदा प्रभाकर महाराज पारायण वाचनाचे नेतृत्व करीत आहे.पन्नास ते साठ क्विंटलचा महाभंडाराउत्सवाच्या सांगतेनिमित्त सुमारे पन्नास ते साठ पोते गव्हाच्या पोळ्या, शेकडो क्विंटल वांगीची भाजी, तीन क्चिंटल वरण अशा भंडाºयाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्यासाठी ग्रामस्थ व भाविक स्वत:हून धान्य वस्तू व रोख स्वरूपात देणगी देऊन महाभंडारासाठी हातभार लावतात. आठ दिवसाच्या महोत्सवाला दैनंदिन नाश्ता, जेवण, चहा आदी कार्याची सुविधा देण्यासाठी भाविकांची मोठी चढाओढ लागलेली असते.स्वयंपाकींना नारळ टोपी चा मानस्वयंपाकासाठी गावातील सुमारे ४५ ते ५० स्वयंपाकी स्वत:हून उपस्थित राहून सहकार्य करतात. या स्वयंपाकींना नारळ टोपीचा मान देऊन सन्मानित करण्यात येते, अशी माहिती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली. उत्सवात पंक्ती वाढण्यासाठी गावातील गणेश, दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी होऊन कार्य करीत असतात.शोभायात्रेचे आकर्षणउत्सवाच्या संगती निमित्त गावातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात येते. त्यात सर्वधर्मीय भाविक सहभागी होऊन उत्सवाला एकात्मतेचा रंग भरतात. नोकरी शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेलेले नशिराबाद येथील नागरिक, तरुण, माहेरवाशीण महिला या उत्सवाकरिता येतात आणि उत्सवात हिरीरिने सहभाग घेतात.
संतांचे संगती मनोमार्ग गती... अकळावा श्रीपती येणे पंथे...., नशिराबादचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:52 PM