पुणे /जळगाव : बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याच्याविरुद्ध तक्रार असल्याने तेव्हाचे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुनील कुराडे यांनी फाॅरेन्सिक ऑडिटसाठी सीए महावीर जैन यांची नियुक्ती केली. त्यामुळे त्याची साडेसहा लाख रुपये फी शासनाने देणे आवश्यक असताना कुराडे यांच्या सांगण्यावरून कंडारे यानेच ही फी अदा केली व एकदिवस अगोदर कंडारे हा कुराडे यांना भेटायला आला होता, यात नक्कीच काहीतरी घडले आहे, असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मंगळवारी पुणे विशेष न्यायालयात केला. दरम्यान, ही चौकशी अजून सुरू असल्याने जैन याच्या जामिनालाही त्यांनी विरोध केला.
महावीर जैन याने वेळाेवेळी कंडारेला मदत केली
बीएचआर घोटाळ्यातील संशयितांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात कामकाज सुरू आहे. त्यात संशयित महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद झाला. महावीर जैन याचा बीएचआर घोटाळ्यात कशा पद्धतीने महत्त्वाचा सहभाग होता. जैन याने समान न्याय तत्त्वाचा वापर न करता वेळोवेळी अवसायक कंडारेला मदत केली आहे. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. जैन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असे मुद्दे मांडून अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जैन याच्या जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेतला.
संशयित कंडारेशी कुराडेंचे संबंध
महावीर जैन कार्यालयातून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला जळगाव एमआयडीसीच्या काही फाईल्स मिळाल्या आहेत?. त्या नेमक्या कशाशी संबंधित आहेत?. तसेच तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुनील कुराडे यांनी ज्या कंडारे विरुद्ध तक्रार होती, त्याच अवसायक कंडारेला फॉरेन्सिक ऑडिटची साडेसहा लाख रुपये फी महावीर जैनला का द्यायला लावली?, असा प्रश्नही अॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला.
कंडारेचीच कशी बीएचआरमध्ये नियुक्ती?
कंडारेची नियुक्ती बीएचआरमध्ये कशी झाली? ही बाबदेखील अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. बुधवारी बचाव पक्ष आपले म्हणणे सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल. दरम्यान, सुजित बाविस्कर (वाणी)च्या जामीन अर्जावरील निकालावर कामकाज होण्याची शक्यता आहे.