सात मोटारसायकली केल्या जप्त, भुसावळ येथे केली अटक
भुसावळ : मागील दोन वर्षांपासून फरार असलेला मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार मुकुंदा डिगंबर सुरवाडे (वय ३६. ह.मु. विवेकानंद नगर, भुसावळ) हा जळगाव व भुसावळ शहरात दर सहा महिन्यांत घर बदलत फिरत होता. त्याचा ठावठिकाण मिळून येत नव्हता. तसेच तो चोरी केलेल्या मोटारसायकली लोकांकडे आई-वडिलांच्या दवाखान्याचे कारण सांगून १५ ते २० हजारांत गहाण ठेवत लोकांची फसवणूक करीत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने पकडले असून, त्याच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ. महेश महाजन, पो.हे.कॉ. ललिता सोनवणे, पो.ना. किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, अविनाश देवरे व रणजीत जाधव, पो.कॉ. विनोद पाटील, उमेशगिरी गोसावी, हरीश परदेशी तसेच वहिदा तडवी, विजय चौधरी, अशोक पाटील यांचे पथक गेल्या ६ महिन्यांपासून मोटारसायकली चोरी करणारा अट्टल गुन्हेगार मुकुंदा डिंगबर सुरवाडे याच्या मागावर होते. सुरवाडे हा भुसावळ येथे फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरील पथक हे भुसावळ येथेच असताना त्यांनी दिनांक २५ ऑगस्ट रोजी आरोपी मुकुंदा डिंगबर सुरवाडे याच्या मुसक्या आवळल्या. त्या वेळी त्याच्याकडून ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या तर ११ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या ठिकाणी त्याने केल्या होत्या चोऱ्या
जळगाव शहर पो.स्टे. हद्दीत दोन, कासोदा पो.स्टे. हद्दीत दोन, जळगाव एमआयडीसी पो.स्टे. हद्दीत एक, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. हद्दीत एक तसेच मध्य प्रदेश देवास येथे एक अशा प्रकारे चोऱ्या त्याने केल्या असून, तो भुसावळ बाजार पेठच्या तीन तर एमआयडीसी जळगाव पो.स्टे.च्या एका गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार होता.