पाथरीचा आरोपी : कोरोनामुळे कारागृहातून झाली होती तात्पुरती सुटका
जळगाव : लहान भावाच्या बायकोच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या संजय शिवराम पाटील (वय ५५, पाथरी, ता. जळगाव) या आरोपीने आत्महत्या केल्याची घटना बिलखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे मंगळवारी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाटील याने २०१५ मध्ये पाथरी येथे लहान भावाची बायको वंदना पाटील हिचा कोयत्याने खून केला होता. या घटनेप्रकरणी संजय पाटील याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालानंतर संजय पाटील हा नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात सोडण्यात आले होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर संजय सासुरवाडी असलेल्या बिलखेड येथे गेला होता. तेथे त्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांकडून पाथरीचे सरपंच शिरीष पाटील व पोलीस पाटील संजीव लंगरे यांना देण्यात आली.
या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेनंतर कुटुंबाने सोडले गाव
वंदना पाटील हिचा खून झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब गाव सोडून इतरत्र स्थलांतरित झाले होते. संजय पाटील हा कारागृहात असल्याने बायको व मुली बिलखेड येथे सासुरवाडीला गेले होते. संजय पाटील याला तीन मुली असून, त्या विवाहित आहेत. या खुनाच्या घटनेपासून संपूर्ण परिवार तणावात होता. संजय व त्याचा भाऊ सुनील हे दोघेही नैराश्यात होते. त्यातूनच संजयने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.