लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : लासूर ता. चोपडा येथे चारित्र्याच्या संशयावरून रतीलाल जगन्नाथ माळी (३२) यास मारहाण केल्याने त्याचा मुत्यू झाला. या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस तापासात यातील फिर्यादीच आरोपी निघाला आहे. भावानेच सख्या भावाला मारून दुसऱ्यांवर खुनाचा आरोप करण्याचा बेबनाव केल्याचे उघड झाले आहे. त्यास अटक करण्यात आली आहे.
प्रदीप उर्फ आबा जगनाथ माळी (२८ रा. लासुर) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, ५ रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास रतिलाल जगन्नाथ माळी हा एका घरात घुसला म्हणून त्याच्या चारित्र्यावर संशय घेत त्याच्या घरात जाऊन लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने रतिलाल माळी याचा मृत्यु झाला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला मयताचा भाऊ प्रदीप माळी याने फिर्याद दिली होती. त्यावरुन मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भुषण कैलास मगरे, दादु राजेंद्र साळुंखे (सर्व रा. लासुर) यांच्याविरुद्ध कलम ३०२, ४५२, ३२३,५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील साक्षीदार व मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील फिर्यादी प्रदीप माळी याचा भाऊ रतीलाल याने यापुर्वी देखील महिलांची छेड काढली होती. त्यामुळे त्याचे लग्न जमत नव्हते तसेच गल्लीत व गावात त्याची बदनामी झालेली होती.
याचा राग मनात धरुन प्रदीप यानेदेखील रतीलाल यास भांडणात छातीत, मानेवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाबात ही बाब निष्पन्न झाली. त्यामुळे खून करणाऱ्या भावास ९ रोजी अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप आराक यांनी केला त्यात पोलीस उपनिरीक्षकपो अमर विसावे, हवालदार भरत नाईक, राजू महाजन, सुनिल जाधव, संदिप धनगर, ईशी पोलीस नाईक विकास सोनवणे, विष्णु भिल, रितेश चौधरी, पोकॉ. सुनिल कोळी, यांनी मदत केली.