फोटो
जळगाव : चोरी करताना घटनास्थळी उमटलेल्या चपलेच्या खुणांवरून एमआयडीसीतील व्ही. सेक्टरमधील महेश प्लॅस्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणाऱ्या संशयित अरविंद अरुण वाघोदे (वय २२ रा. सुप्रीम कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. काही दिवसांपूर्वी वाघोदे याने एका कंपनीतून २० लाख ६८ हजार ४४० रुपयांची रोकड लांबविली होती.
एमआयडीसीतील व्ही. सेक्टरमधील महेश प्लॅस्टिक इंडस्ट्रीज या कंपनीतून आठ हजार रुपये किमतीचा टीव्ही, सात हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व इतर साहित्य असा २० हजाराचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना १३ मे रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी कंपनी मालक तुषार दयाराम राणे (रा. गणेशवाडी) यांच्या फिर्यादीवरुन १७ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महेश प्लॅस्टिक इंडस्ट्रीज ही कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे. संशयित हा चोरी करत असतांना या धुळीमध्ये त्याच्या चपलाच्या खुणा उमटल्या होत्या. आधीच्या गुन्ह्याची पद्धत व आताच्या गुन्ह्याची पद्धत सारखीच असल्याने पोलीस अंमलदार इम्रान सैयद यांनी वाघोदेवर लक्ष केंद्रित केले. त्यात भर पडली ती चपलाच्या खुणांची. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी अरविंद वाघोद याला पोलीस ठाण्यात बोलाविले. यावेळी वाघोदे यानेही आपण पकडले जाऊ नये अशी खबरदारी घेत स्वतःची चप्पल न वापरता वडिलांची चप्पल घालून तो पोलीस ठाण्यात आला. यावरून संशय अधिकच पक्का झाला. बुधवारी सकाळी इमरान सैय्यद याने सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, विजय बावस्कर या कर्मचाऱ्यांसह अरविंद वाघोदे याचे घर गाठले. घराबाहेर अरविंद याची घटनेच्या दिवशीची चप्पल दिसून आली. घटनास्थळी उमटलेल्या चपलेल्या खुणा या त्याच्या चपलेच्या असल्याचे यावेळी निष्पन्न झाल्याने कर्मचाऱ्यांनी अरविंद यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.