जळगाव - जामोद तालुक्यातील ग्राम खेर्डा खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी रात्री एका निराधार दिव्यांग महिलेवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी रितेश गजानन देशमुख यास जळगाव जामोद न्यायालयाने रविवारी १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
खेर्डा येथे अत्याचार करून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी श्वास पथकाच्या मदतीने आरोपीस ७ डिसेंबर रोजी अटक केली. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी आरोपीला स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश पाल यांनी त्याला ८ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी अटक झाल्यानंतर जळगाव पोलिसांनी आरोपी रितेश देशमुख याच्या विरूध्द भादंविच्या कलम ३०२, ३७६ (२) (जे) (एल) आणिा ४५२ अन्वये गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणामुळे खेर्डा येथे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी आरोपीस अटक केल्यामुळे वातावरण निवळले असून सध्या गावात शांतता आहे. न्याय वैधानिक प्रयोगशाळा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सध्या आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी दिलेली आहे. या काळात आरोपीविरूध्द पुरावे गोळा करण्यात येतील. त्या आधारावर केस मजबूत बनविण्याचा प्रयत्न राहील. - प्रिया ढाकणेउपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूरतथा तपास अधिकारी