अमळनेर, दि.4- पारोळा तालुक्यातील टिटवी येथील महिलेच्या खूनप्रकरणातील आरोपी सुखराम ज्योतीराम भिल (टिटवी) यास अमळनेर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज दिला.
सुमनबाई गुलाब भिल ही महिला 25 नोव्हेंबर 2015 रोजी आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी दोन-अडीच वाजेच्या सुमारास गावातील आरोपी सुखराम भिल याने त्या महिलेला लाकडी दांडय़ाने मारहाण करीत तिचा गळा आवळला. जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.
याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्या. कोठलीकर यांनी आरोपी सुखराम भिल यास जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. (वार्ताहर)