जळगाव : येथील गणपती हॉस्पिटल या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत असलेल्या आणि गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी नऊ फिजिशियन व भूलतज्ज्ञांची सेवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत.या डॉक्टरांनी सकाळी आठ वाजता नियुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच ड्यूटी संपल्यानंतर दुसरे पथक येईपर्यंत काम पाहावे. सेवा कालावधीत व सेवा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही क्वारंटाइन सुविधा पुरविणे, जेवण व निवासाची व्यवस्था आदींबाबतचा खर्च जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याशिवाय सेवा कालावधीतील मानधन अदा करण्यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे. डॉ. रवी कुकरेजा (फिजिशियन), डॉ. ललित पाटील (भूलतज्ज्ञ), १० ते १४ जून, डॉ. मनोज टोके (फिजिशियन), डॉ. हेमंत पाटील (भूलतज्ज्ञ) १५ ते १९ जून. डॉ. अभिषेक फिरके, डॉ. सुनील तायडे, २० ते २४ जून. डॉ. उमंग पाटील, डॉ. कृष्णांत भोळे, २५ ते २९ जून. डॉ. निखिल पाटील, डॉ. वर्षा वारके, ३० जून ते ४ जुलै. डॉ. किरण पाटील, डॉ. जयश्री राणे, ५ ते ९ जुलै, अशी डॉक्टर्सची सेवा राहणार आहे.
नऊ खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:59 AM