जळगाव : बंदी असतानाही चारचाकीला काळ्या काचा अथवा फिल्म लावलेल्या २३५ वाहनांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
चारचाकी वाहनांना काळी काच किंवा काळी फिल्म लावण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. असे असतानाही वाहनचालक व मालक अशी फिल्म लावण्यास आग्रही असतात. कोणी कितीही आग्रह केला तरी अशा काचा लावू नयेत याबाबत कार डेकोरचालकांनाही आरटीओकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे असतानाही पैशाच्या लोभापायी कार डेकोरचालक फिल्म व काळ्या काचा लावून देत असल्याचे उघड झालेले आहे. काही डेकोरचालक आरटीओने घालून दिलेल्या नियमातच काच बसवून देतात, पण काही व्यावसायिक हे नियम धाब्यावर बसवतात. मोटार वाहन कलम १००/२/१७७ अन्वये काळ्या काच लावणाऱ्या वाहनावर कारवाई केली जाते. काळ्या काच असलेली अनेक वाहने रस्त्यावर धावताना दिसून येतात, यातील सर्वाधिक वाहने व्हीआयपी किंवा बड्या घराण्यातील लोकांचीच असल्याचे आढळून येतात.
--