गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन होते. विनापरवानगी बाहेर फिरायलाही तेव्हा बंदी होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच हा नियम लागू करण्यात आला होता. ज्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर प्रशासनाने कलम १८८, जमावबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. याअंतर्गत जागेवर दोनशे रुपयांचाही दंड आकारण्यात आला होता. दुकानदारांवर कारवाया करून त्यांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली होती. विनापास प्रवास करणाऱ्या लोकांवर तसेच वाहनांवरही कारवाया करण्यात आल्या. परवानी नसताना अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक होते. ९ हजार ८३६ जणांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांकडून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्याशिवाय पास नसतानाही एका तालुक्यातून, जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या १ हजार १६२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती.
कोरोना नियंत्रणासाठीच्या कारवाया
दाखल गुन्हे -१४६३०
विनामास्क कारवाई -९८३६
ट्रिपल सीट -४२२
मंगल कार्यालय, हॉल -२८
२०२१ मध्ये तीन हजार जणांना दंड
जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून कडक नियम लागू झाला. विनामास्क फिरणाऱ्या ३ हजार ७७६ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमविणाऱ्या ११७ जणांवर कारवाई झाली आहे, त्यांच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. मंगल कार्यालय मालकांकडूनही ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय १८८ अन्वये २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोट....
कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. गस्त, दैनंदिन कामे व गुन्ह्यांचा तपासामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आहे, त्यात कोरोनाशी लढावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांकडून कलम १८८ अन्वये कारवाई केली जाते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझी जबाबदारी समजून शासन नियमांचे पालन करून स्वत:च आणि कुटुंबाचा बचाव करावा.
-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक