जळगाव : गेल्या तीन महिन्यांत मास्क न घालता फिरणाऱ्या १०६ बेजबाबदार नागरिकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत या नागरिकांकडून प्रत्येकी ५०० याप्रमाणे ५३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्यासुध्दा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले आहेत. त्यात नागरिकांना मास्कचा वापर करणे हे बंधनकारक केले आहे. मास्क न घालता शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जळगाव मनपा व पोलिसांकडून अशा नागरिकांवर कारवाई करीत ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत शहर वाहतूक पोलिसांनी मास्क न घालता फिरणाऱ्या १०६ नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पाचशेप्रमाणे ५३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, आता चौकाचौकांत पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. विनाकारण फिरताना आढळून येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
मोबाईलवर बोलणे पडले महागात
वाहतूक पोलीस व स्वयंसेवी संस्थांकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतात. असेच वाहन चालवित असताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, अशा १४८६ वाहनधारकांवर शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत कारवाई केली असून त्यांच्याकडून २ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट न वापणाऱ्यांवर कारवाई
अपघाताचे प्रमाण पाहता हेल्मेट वापरण्याच्या सूचनाही वाहतूक शाखेकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ३६० हेल्मेट न वापणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ८० हजारांचा दंड वसूल केला आहे. दुसरीकडे, सिटबेल्ट न लावलेल्या ४ हजार ७८ चारचाकी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारत सुमारे आठ लाखांचा दंड वसून करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.