जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून बुधवारी शहरातील १४ हॉकर्सवर कारवाई करून, त्यांच्याकडील माल जप्त करण्यात आला. यासह शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांवरदेखील मनपाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान नवीपेठ परिसरात मनपाचे पथक दाखल होताच विक्रेत्यांनी एकच पळापळ सुरू केल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
वॉटरग्रेस कंपनीला ५ हजारांचा दंड
जळगाव - शहराची दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी कचऱ्याऐवजी मातीचा वापर करण्याचा उपद्रव सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केला होता, तसेच मनपाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मनपा आरोग्य विभागाने वॉटरग्रेस कंपनीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
फुपनगरीतील त्या वाळूच्या साठ्याला कोणाचे अभय
जळगाव - तालुक्यातील फुपनगरी येथे दररोज गिरणा पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. तसेच नदीपात्रातून उपसा केल्यानंतर फुपनगरी गावामधून कानळदाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या काही गोठ्यांजवळ वाळूचा मोठा साठा केला जात आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर बुधवारी महसूलच्या पथकाने याठिकाणी पाहणी केली; मात्र कोणतीही कारवाई न करताच हे पथक परतले आहे. यामुळे या वाळूच्या साठ्याला नेमके कोणाचे अभय आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून, हा साठा ताब्यात घेऊन संबंधितांवर कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न आता फुपनगरी ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.