लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाने हॉकर्सला रस्त्यावर व्यवसाय करणे मनाई केली असतानादेखील, गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात दुकाने थाटणाऱ्या १५० अनधिकृत हॉकर्सवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. मनपा व पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी शहरात संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्यालगत लावण्यात आलेल्या ७५ हात गाड्या देखील महापालिका प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून शहरातील बाजारपेठांमधील दुकाने व इतर मार्केट उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र पहिल्या दोन दिवसातच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाढत जाणारी गर्दीमुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. बाजारपेठेमधील गर्दी टाळण्यासाठी व प्रशासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी गुरुवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण यंत्रणा बाजारपेठेत तैनात करण्यात आली होती. मुख्य रस्त्यालगत कोणताही दुकानदार किंवा हॉकर्स व्यवसाय करणार नाही यासाठी मनपाचे पथक मुख्य बाजारपेठेत ठाण मांडून बसले होते.
व्यवसाय सुरू करताच मनपाकडून ही कारवाई सुरू
महापालिका प्रशासनाने हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी शहरातील नऊ जागा निश्चित करून दिल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी व्यवसाय न करता गुरुवारीदेखील अनेक हॉकर्स बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड, महात्मा फुले मार्केट परिसर व चित्रा चौक परिसरात रस्त्यावरच व्यवसाय करतांना दिसून आले. मात्र गुरुवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांचा नेतृत्वाखाली मनपाचे पथक सकाळी सात वाजेपासूनच बाजारपेठेत तैनात झाले होते. मनपा पथकाकडून रस्त्यावर व्यवसाय करताना आढळलेल्या प्रत्येक हॉकर्स वर कारवाई करून माल जप्त करण्यात आला.
हॉकर्स व मनपा कर्मचा-यांमध्ये वाद
महापालिका प्रशासनाने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या सोबतच, रस्त्यावर उभ्या केलेल्या हात गाड्या देखील जप्त केल्या आहेत. या गाड्या जप्त करताना व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये बळीराम पेठ व इस्लामपूर या परिसरात चांगलाच वाद झाला. मात्र तत्काळ पोलीस प्रशासनाने याठिकाणी येऊन वाद घालणाऱ्या असला समजल्यानंतर हा वाद शांत करण्यात आला. तसेच काही विक्रेत्यांवर कारवाई करताना देखील काहींनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. या कारवाई दरम्यान मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने तब्बल ७५ हात गाड्या जप्त केल्या आहेत.
फुले मार्केटमधील रसवंतीसह चार दुकाने सील
शहरातील फुले मार्केट परिसरात एका रसवंतीमध्ये २० पेक्षा अधिक ग्राहक आढळल्याने रसवंती मालकावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही दुकानांमध्येदेखील ग्राहकांची संख्या जास्त आढळल्याने नवी पेठ, बळीराम पेठ परिसरातील तीन दुकाने सील करण्यात आली आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाने प्रत्येक दुकानदाराला ग्राहक व विक्रेता मधील अंतर पाडण्यासाठी प्लॅस्टिक शिल्ड लावण्याचे आदेश काढले आहेत.