लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेसह ठिकाठिकाणी होणारी गर्दी व त्यातून होणारे अपघात, या पार्श्वभूमीवर पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात येऊन एक हजार ९२४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या ४६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या सोबतच ३३१ वाहनधारकांकडून दोन लाख १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दिवाळी सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याने वाहतुकाचीही कोंडी होवून अपघात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपापल्या क्षेत्रात ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करुन तपासणीचे निर्देश दिले. यात मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत १२ पोलिस अधिकारी व १७० पोलिस अंमलदारांनी ४० ठिकाणी नाकाबंदी करून एक हजार ९२४ वाहनांची तपासणी केली. त्यात ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’च्या एकूण ४६ कारवाई करण्यात आल्या. या सोबतच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ३३१ वाहनचालकांविरुध्द कारवाई करुन त्यांचेकडून एकूण दोन लाख १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.