जळगाव : पाचोरा तालुक्यातील हमाल-मापाडी संस्थेच्या ठेक्यासाठी दोन ते तीन दिवसात नवीन निविदा काढण्यात येणार असून अगोदरच्या ठेक्याप्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दिला.
पाचोरा तालुक्यातील हमाल-मापाडी संस्थेच्या ठेक्यात गैरव्यवहार होऊन पुरवठा विभागाने ज्या संस्थेला हा ठेका दिला त्या संस्थेच्या हमाल-मापाडींच्या यादीत नोकरी करणारेच होते, असा आरोप आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. इतकेच नव्हे ज्याचा ठेका रद्द केला त्याच्या मित्रालाच पुन्हा ठेका देण्यात आल्याचाही मुद्दा आमदार पाटील यांनी मांडला. यात पुरवठा विभाग दोषी असून त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल, असा प्रश्न उपस्थित करीत नवीन निविदा कधी काढणार अशी या विषयी विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकारी राऊत यांनी या संदर्भात दोन ते तीन दिवसात नवीन निविदा काढण्यात येणार असून ठेक्याप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, पाचोरा तालुक्यातील हमाल-मापाडी संस्थेचे ठेका प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोहचले होते. निविदा राबविताना व नंतर ठेका देताना मर्जीतील संस्थेला ठेका देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या विषयी ‘लोकमत’नेही सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर हा विषय मंत्रालयापर्यंत पोहचला व याच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांनाही मुंबई येथे बोलविण्यात आले होते.