पहूर, ता. जामनेर : कृषी पंपाच्या थकीत वीज बिलापोटी येथील वीज वितरण विभागाने वीज जोडणी तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पहूरसह परिसरातील संतप्त शेतकरी शुक्रवारी वीज वितरण कार्यालयावर धडकले. कारवाई थांबवा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
वीज वितरण कंपनीला कोणतेही आदेश नसताना शेतकऱ्यांकडील कृषी पंपाची वीज जोडणी तोडण्याची धडक कारवाई हातात घेतली आहे. वाकोद, नाचनखेडा व गोंदेगाव फिडरवरील तेवीस कृषी पंपांची जोडणी तोडण्यात आली. यामुळे शेतकरी संतप्त झाले. माजी उपसरपंच योगेश भडांगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामरामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, वासुदेव राऊत, पुंडलिक घोंगडे, चंद्रकांत क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, विनोद सोनवणे यांच्यासह २० ते २५ शेतकरी शुक्रवारी दुपारी वीज कार्यालयात धडकले.
तिथे वरिष्ठ अधिकारी नसल्याने लिपिक नरेंद्र पांढरे व वरिष्ठ लाइनमन योगेश बेलदार यांना निवेदन देण्यात आले. लिखित आदेश व सूचना पत्र कारवाईचे वीज कर्मचाऱ्यांकडे पत्र नाही. वीज जोडणी तोडताना शेतकरी कारवाईचे पत्र मागत असल्याने संबधित कर्मचाऱ्यांनी कारवाईचे सत्र
थांबविले आहे. लिखित स्वरूपात आदेश येईपर्यंत कारवाई थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. भाजीपाल्याला भाव नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत वीज जोडणी तोडल्यास शेतातील पिके जळून जातील. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळी करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला
सामोरे जावे लागेल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोट
वीज जोडणी तोडण्याची कारवाई न थांबविल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील. वरिष्ठ यासंदर्भात आमदार गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. - पूजा योगेश भडांगे, उपसभापती पंचायत समिती जामनेर
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कृषी पंपाची वीज जोडणी तोडण्याची कारवाई केली आहे. - योगेश बेलदार, वरिष्ठ लाइनमन, पहूर उपविभाग
फोटो ओळी: वीज वितरण उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारताना वीज
कर्मचारी.