जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या ठिकाणी अनेक कामे रखडलेली आहे. ही कामे आठवडाभरात सुरू न झाल्यास ठेकेदारासह अधिकाऱ्यांची केंद्रीय मंत्रालयाकडे तक्रार करण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आला. या कामावरून ‘नही’चे तर वीज जोडणी, रोहित्र मिळत नसल्याच्या तक्रारींवरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यात ‘नही’चे अधिकारी बैठकांनाही हजर राहत नसल्यावरून उपस्थित लोकप्रतिनिधींसह बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही अधिकाऱ्यांना जाब विचारला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांकडूनही नियम धाब्यावर
खासदार रक्षा खडसे यांनी जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करीत या कामात ‘नही’च्या अधिकाऱ्यांकडूनच नियम धाब्यावर बलविले जात असल्याचा आरोप केला. गुरुवारी झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीलाही हे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी जाब विचारला. यावर कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीचा निरोप नसल्याचे सांगितले. त्यावरून लोकप्रतिनिधी अधिकच संतापले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनीही वर्षभरात ४३६ जणांचा या मार्गावर मृत्यू झाला तरी तुम्हाला गांभीर्य नाही का? असा सवाल करीत रोष व्यक्त केला. घाटामध्ये रस्ता पूर्णपणे खराब झाला असून टप्प्याटप्प्याने कामे न करता सर्व नियम धाब्यावर बसविले असून ही कामे कधी मार्गी लागतील, असा सवाल खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित केला. मार्चपर्यंत रस्त्याचे व जूनपर्यंत पुलांचे काम पूर्ण होईल, असे ‘नही’तर्फे सांगण्यात आले. त्यावर आठवडाभरात कामाला सुरुवात केली नाही तर थेट तक्रार करून कारवाई केली जाईल, असा इशारा खासदार खडसे यांनी दिली.
१५ दिवसात अडथळे दूर करा
जळगाव-औरंगाबाद मार्गावर अजिंठा चौफुली ते कुसुंबापर्यंतचेही काम रखडले असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी नमूद केले. त्यावर ‘नही’च्या अधिकाऱ्यांनी हा भाग धुळे विभागाकडे असल्याचे सांगितले. त्यावरील स्थलांतराचे काही कामे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. १५ दिवसात हे अडथळे दूर करा काम पूर्ण करा, अशा सूचना खासदार पाटील यांनी दिल्या.
यावल-भुसावळ रस्त्याचा ठेका रद्द करा
यावल ते भुसावळ रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून तक्रारी करूनही हे काम होत नसल्याचे आमदार संजय सावकारे यांनी नमूद केले. त्यावर हे काम कोण करते अशी विचारणा सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना करण्यात आली. त्यावर त्यांनी या कामाविषयी सूचना देण्यात आल्याचे सांगितले. यात हा ठेका या पूर्वी काढूनही घेण्यात आला होता. मात्र पुन्हा त्याच ठेकेदाराने निविदा भरल्याचे समोर आल्याने सदर ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकत नाही, अशी विचारणाही लोकप्रतिनिधींनी केली. मात्र ही मोठी प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आल्याने आता हा ठेका काढून घ्या, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
महावितरणच्या तक्रारीतच अर्धा वेळ जातो
या बैठकीतही महावितरणच्या कामकाजाबाबत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. पाचोरा येथून रोहित्र दिले नाही म्हणून रोष व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी स्थानिक अधिकाऱ्यांना १० हजारांचा दंड केला जात आहे. जळगावात तर १० एमव्हीएचे रोहित्र जळाले, त्याला मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता जबाबदार असल्याने त्यांना किती दंड करावा, असा सवाल आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केला. या सोबतच नवीन आदेश असतानाही वीजपुरवठा मिळत नसल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले. या विषयी अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कामे मार्गी लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच रोहित्र मिळत नसल्याची तक्रार सर्वच आमदारांनी केली. यावर महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी दंड प्रक्रिया ही कार्यालयीन भाग असून जिल्हाभरात हे दंड केले जातात, असे सांगितले. यात महावितरणच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या व या प्रकारामुळे बैठकीचा निम्मा वेळ महावितरणच्या तक्रारीतच जातो, असे पालकमंत्री पाटील यांनी नमूद करीत कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.