जळगाव : जिल्ह्यात वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी आणि या व्यवसायातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ॲक्शन प्लान तयार केला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या मागे फिरणाऱ्यांवर एमपीडीए लावला जाईल, तसेच व्यवसायात असणाऱ्यांवर चॅप्टर केस केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आयुष प्रसाद सकाळी, रेल्वेने जळगावात दाखल झाले. आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून स्थानिक मुद्द्यांची माहिती घेतली. मावळते जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. पोलिस अधीक्षक, महसूलचे अधिकारी व महापालिका आयुक्तांशी भेट झाली. वाळूच्या प्रश्नावर अतिरिक्त जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली आहे. हे दोन्ही अधिकारी मिळून सविस्तर ॲक्शन प्लान तयार करणार आहेत. बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. तहसीलदारांच्या मागे फिरणाऱ्यांवर एमपीडीए लावला जाईल, चोरट्या वाळू व्यवसायात असलेल्या व्यक्तींवर चॅप्टर केसेस दाखल केल्या जातील, हद्दपारी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मी सगळ्यांचा मित्र, पण...
मी प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी आहे. जनतेसाठी २४ तास उपलब्ध आहे. जनसेवा हेच माझे काम आहे. शनिवारी, रविवारी देखील कामाला प्राधान्य देतो. ‘मी सगळ्यांचा मित्र आहे, पण मी कोणाचा मित्र नाही’, असेही आयुष प्रसाद म्हणाले.