जळगाव : सहकारी वरिष्ठ डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या करणाºया डॉ. पायल तडवीला न्याय मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी दुपारी जळगावात काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, डॉ. पायल तडवी यांना मागासवर्ग जागेवर प्रवेश मिळालेला होता. तिला जातीवाचक बोलणे, आर्थिक कुवत नसताना केवळ मागास असल्याने प्रवेश मिळाल्याने अपमानास्पद बोलणे, अशा अनेक प्रकारे धमक्या देत वरिष्ठ डॉक्टरांनी रॅगिंग करीत तिचा छळ केला होता. अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या संशयास्पद असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचाही आरोप कुटुंबियांनी केला आहे. आत्महत्येस आठ दिवस उलटूनही ठोस कारवाई होत नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर अॅट्रॉसिटी व रॅगिंग विरोधी कायदा अंतर्गत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या घटनेचा जळगाव जिल्हा महानगर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.अर्जुन भंगाळे, देवेंद्र मराठे उपस्थित होते. निवेदनावर जळगाव ग्रामीणचे तालुकाध्यक्ष श्याम तायडे,अविनाश भालेराव, भगतसिंग पाटील, सुरेश पाटील,अजबराव पाटील,चोपडा शहराध्यक्ष के.डी. चौधरी, संजीव बाविस्कर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
पायल तडवी आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे - जळगावात निवेदनाद्वारे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:20 PM