लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाच्या ३० व्हेंटिलेटर खरेदीप्रकरणात चौकशीनंतर ही खरेदीच रद्द केल्यानंतर आता पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई होण्याची चिन्हे गडद झाली आहे. आरोग्य संचालकांना या प्रकरणाचा एकत्रित अहवाल पाठविण्यात येणार असून आरोग्य विभागामार्फत पुरवठादार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली ही सर्व प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे त्यांच्यासह पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल यांच्यावर कारवाईची मागणी तक्रारदार दिनेश भोळे यांनी तक्रारीत केली आहे. त्या अनुषंगाने आता खरेदी प्रक्रिया तर रद्द झाली मात्र, ही प्रक्रिया राबविणारे अधिकारी यांच्यावर पुढे काय कारवाई, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यात आता या प्रकरणाचा एकत्रित अहवाल एकत्रित वरिष्ठ पातळीवर पाठविला जाणार आहे.
समितीचा अहवाल वाढता वाढता वाढला
या व्हेंटिलेटर घोळात प्रशासन अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बालरोगतज्ञ डॉ. वृषाली सरोदे यांच्यासह इलियाज शेख, लिपिक दीपक साठे, अभियंता एकनाथ काकडे, कंपनीचे अभियंता अशोक ओठे या समितीने ११ दिवस विविध पातळ्यांवर चौकशी करून अहवाल सादर केला. समितीने अगदी सुरुवातीला दोन पानी अहवाल दिला होता. त्यानंतर यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी काही बदल सुचविले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हा अहवाल फॅारमॅटमध्ये मागितला. अशा ११ दिवसांनी हा अहवाल वाढता वाढता २० पानांचा झाला व त्याला जिल्हा शल्यचिकित्सकांनी कव्हरिंग लेटर जोडून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केला होता. यात स्पेसिफिकेशनमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्यानंतर ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
कोट
एकत्रित अहवाल पाठविला जाणार आहे. खरेदीप्रक्रिया रद्द करण्यात आली असून संचालकांना अहवाल गेल्यावर राज्य आरोग्य विभागामार्फत पुरवठादार व जबाबदार अधिकारी यांचेवर कारवाई होईल. - अभिजित राऊत, जिल्हाधिकारी