मुख्य बाजारपेठेतून हॉकर्स अखेर गायब : मास्क न लावणाऱ्या ५४ जणांवर मनपाकडून कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा प्रशासनाने शहरातील दुकानदारांना ग्राहक व विक्रेता यामध्ये अंतर ठेवण्यासाठी प्लास्टिक शिल्ड लावण्याच्या सूचना दिल्याबद्दल देखील, अनेक दुकानदारांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शुक्रवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने प्लास्टिक शिल्ड न लावणाऱ्या ७२ दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच मनपा प्रशासनाकडून शुक्रवारी देखील ४ दुकाने सील करण्यात आली आहेत.
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरासह विविध उपनगरांमधील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या व जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून, शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य बाजारपेठ परिसरासह फुले मार्केट, गोलाणी मार्केट येथे देखील उपायुक्तांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान ज्या दुकानदारांनी दुकानात प्लास्टिक शिल्ड लावले नव्हते, अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दुकानदाराकडून एक हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
हॉकर्स झाले गायब, रस्त्यावर शुकशुकाट
गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरातील अनधिकृत हॉकर्सवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. एकाही अनधिकृत हॉकर्सने दुकाने थाटली नव्हती.