जळगाव : एकाच दिवशी तपासणी करून वेगवेगळे अहवाल आलेल्या शिवाजीनगरमधील योगेश कदम या रुग्णावर आता मनपा प्रशासनाने कारवाईच्या हालचाली सुरु केल्या आहेत. संबधित रुग्णाला बुधवारी महापालिका वैद्यकीय विभागाने नोटीस बजावली आहे.वैद्यकीय सल्ला न मानता शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ नुसार कारवाई का करण्यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस मनपाने संबधित रुग्णाला बजावली असल्याची माहिती मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलाणी यांनी बुधवारी महापौरांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे आदी उपस्थित होते. डॉ.राम रावलाणी यांनी सांगितले की, अॅन्टीजन टेस्ट पॉझीटीव्ह आली म्हणजे रुग्ण हा पॉझीटीव्हच समजला जातो. त्यामुळे संबधित रुग्ण पॉझीटीव्ह आल्यानंतर कोवीड केअर सेंटरमध्ये भरती होण्याचा सूचना मनपा वैद्यकीय विभागाने दिल्या होत्या. मात्र, संबधित रुग्णाने कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल न होताच घरी परतले. यामुळे इतरांनाही संसर्ग होण्याची शक्यता होती. संबधित रुग्णाने ही काळजी घेतली नाही. त्यामुळे त्या रुग्णाला नोटीस बजावण्यात आली आहे.
‘त्या’ रुग्णावर मनपाकडून कारवाईच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:42 PM