जळगाव : जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतील नोटा बदली प्रकरणी सीबीआय चौकशी झाली. यात बॅँकेतील काही अधिका:यांची चौकशी झाली व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रश्नी अद्याप चौकशी सुरू असून दोषारोपत्रामध्ये त्यांचे नाव येईल त्या अधिकारी व कर्मचा:यावर जिल्हा बॅँक कारवाई करेल असे माजी मंत्री तथा जिल्हा बॅँकेचे संचालक एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतून 73 लाख 32 हजाराच्या जुन्या 500 व हजाराच्या नोटा बदली प्रकरणी बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, बॅँकेचे चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील, रोखपाल रविशंकर गुजराथी यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा बँकेत सीबीआयने केली होती चौकशीयात गेल्या 2 मार्चला सीबीआयच्या पथकाने येथे मुक्काम ठोकून जळगावची मुख्य शाखा तसेच चोपडा शाखेत जाऊन अधिका:यांची कसून चौकशी केली होती. यानंतरही सीबीआय पथकाने जळगावी येऊन तसेच बॅँकेच्या अधिका:यांना मुंबईत बोलावून चौकशी केली आहे. तसेच नंतरही जिल्हा बँकेशी संबंधितांचे जबाब सीबीआयने घेतले आहेत. नाबार्ड, राज्य शासनाला विनंती करणारबॅँकेला आगामी काळात मोठय़ा प्रमाणात खरीप कर्ज वितरित करावयाचे आहे मात्र वसुली कमी आहे. अशा परिस्थितीत वसुलीवर भर देण्यात येणार असल्याचे खडसे म्हणाले. तसेच नाबार्ड व राज्य शासनाला क्रेडिट वाढवून देण्याबाबत व आर्थिक मदत मिळावी असा प्रस्ताव दिला जाईल. राज्यातील बहुतांश बॅँकांपुढे ही समस्या असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. बॅँक आर्थिक अडचणीत नाहीराज्यातील 10 जिल्हा बॅँका पुन्हा अडचणीत आल्या आहेत. जिल्हा बॅँकेची याबाबत परिस्थिती काय, असे विचारले असता खडसे म्हणाले, 9 टक्क्याच्या आत ज्या बॅँकांचा सीआरआर आहे त्या अडचणीत आल्या आहेत. सुदैवाने आपल्या बॅँकेचा सीआरआर 9 टक्क्यांवर आहे. त्यामुळे अडचणीतील या बॅँकांमध्ये जिल्हा बॅँकेचा समावेश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेत 210 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा पडूनजुन्या नोटा बदलीच्या काळात जिल्हा बॅँकेने 210 कोटींच्या नोटा बदलून दिल्या. त्या अद्यापही बँकेत पडून आहेत. यामुळे बॅँकेचा एवढा पैसा अडकून पडला आहे. जिल्हा बॅँकेवरील र्निबध हटविले असले तरी त्याबाबतचे परिपत्रक केंद्राने काढलेले नाही. हे आदेश निघाल्यावर बॅँकेचे 210 कोटींबाबत निर्णय होईल, त्यामुळे त्या आदेशांची प्रतीक्षा असल्याचेही खडसे म्हणाले. सीबीआयच्या पथकाने बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व चोपडा शाखेतील दोघा अधिका:यांची नोटा बदली करून दिल्या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल केला याबाबत बॅँकेने अद्याप कुणावरही कारवाई केली नसल्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, बॅँकेच्या अधिका:यांची यात चौकशी झाली व अद्याप ही प्रक्रिया सुरू आहे. चौकशी सुरू असल्यामुळे त्याबाबत जास्त बोलणे उचित होणार नाही. चौकशी सुरू असताना कुणावर बॅँकेने कारवाई करणे अन्यायकारक ठरेल. याप्रश्नी दोषारोपपत्रात ज्याचे नाव येईल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सीबीआय’च्या दोषारोपपत्रात नाव येईल ‘त्या’ अधिका:यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 1:12 AM