जळगाव : जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५९१५ वर आली असून रविवारी नवे रुग्ण व बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये तिपटीचा फरक असल्याने सक्रिय रुग्ण घटले आहेत. दरम्यान, शहरात २१ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हाभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. रविवारी चाचण्यांचे प्रमाण कमी असले, तरी बाधितांचे प्रमाणही घटले आहे. ३८९२ ॲटिजन चाचण्यांमध्ये ७७ बाधित आढळून आले असून ४०६७ आरटीपीसीआर अहवालांमध्ये ८४ बाधित आढळून आले आहेत. तर, रविवारी २९८२ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये जळगाव शहरातील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश असून जळगाव तालुका, जामनेर व पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपसून मृत्यूची संख्या ४ वर स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे.
सक्रिय रुग्ण ५९१५
लक्षणे असलेल्यांची संख्या १००९
लक्षणे नसलेल्यांची संख्या ४९०६
ऑक्सिजनपुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या ५२०
आयसीयूतील रुग्ण : ३९३