लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी जळगावात विविध कार्यक्रम पार पडले. शुक्रवारीच कोरोना बाबत दक्षता न घेतल्यास धोका कायम असल्याचे वक्तव्य करून गर्दी टाळण्याचे आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. मात्र, या आवाहनाला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच शनिवारी हरताळ फासत कोरोना नियमांचे उल्लंघन करीत सर्वच कार्यक्रमांना तोबा गर्दी केली होती. राष्ट्रवादी कार्यालयाला तर यात्रेचे स्वरूप आले होते. गंभीर बाब म्हणजे अनेकांना तर मास्कचा विसर पडला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या गर्दीतून कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रसंग १ राष्ट्रवादी कार्यालय
राष्ट्रवादीच्या कार्यालयात छगन भुजबळ यांनी सकाळी दहा वाजता भेट दिली. या ठिकाणी बसायला जागा नव्हती इतकी प्रचंड गर्दी उसळली होती. गोंधळाचे वातावरण वाढले होते. फिजिकल डिस्टन्सिंगबाबत पदाधिकारी आवाहन करीत असताना या ठिकाणी मात्र, पुर्णत: फज्जा उडालेला होता. व्यासपीठाच्या आजुबाजुला सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला होता. अनेक जण विना मास्क होते.
प्रसंग २ एका हॉस्पीटलला भेट
छगन भुजबळ यांनी एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणीही पदाधिकारी व कार्यकर्ते होतेच. जागा कमी व व्यक्ती अधिक अशी स्थिती या ठिकाणी होती. अनेकांनी मास्क परिधान केलेले नव्हते. शिवाय छगन भुजबळ यांना माहिती देणारेच विना मास्क होते.
तर त्या दौऱ्याची पुनरावृत्ती
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात दौरा झाला होता. त्यांच्या उपस्थितीत जळगाव शहरात विविध कार्यक्रम व तेव्हादेखील प्रचंड गर्दीत झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून रुग्णवाढ सुरू झाली होती. यात राष्ट्रवादीचे अनेक जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यावेळीही प्रचंड गर्दीत व विना मास्क कार्यक्रम पार पडले आहे. त्यामुळे त्या दौऱ्यानंतरच्या प्रसंगाची आता पुनराववृत्ती तर होणार नाही ना अशीही एक भिती व्यक्त केली जात आहे.