कुंदन पाटील, जळगाव : केंद्र शासनाने देशभरातील सीमा तपासणी नाके बंद करण्याचे निर्देश दिले असताना राज्यात मात्र अदानी गृपच्यावतीने वसुली केली जाणार आहे. त्यामुळे खासगीकरणातून होणाऱ्या या वसुलीविरोधात राज्य ट्रक-टेम्पा-टॅंकर्स वाहतूक महासंघाने ‘चक्काजाम’ करण्याची भूमिका घेतली आहे. केंद्रीय हिवाळी अधिवेशनात देशभरातील सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला असून तसे निर्देशही दिले आहेत. त्यानुसार गुजरात राज्यात चेकपोस्ट बंद करण्यात आले आहेत. मात्र राज्य शासनाने दि.२७ मार्च रोजी एक आदेश काढला.
त्यानुसार चोरवड (जळगाव), मरवडे (सोलापूर), कागल (कोल्हापूर), देगलूर (नांदेड) व इन्सुली (सिंधुदुर्ग) याठिकाणी आधुनिक सीमा तपासणी नाके कार्यान्वीत करुन सेवा शुल्क आकारण्याचे आदेश दिले. महासंघाच्या म्हणण्यानुसार हा ठेका अदानी गृपला देण्यात आला आहे. राज्य शासनाने घाईगर्दीने घेतलेला हा निर्णय न्याय्य नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने काढली वाट
राज्यात २२ सीमा तपासणी नाक्यांना बांधा, वापरा व हस्तांतरण (बीओटी) या तत्वावर मान्यता देण्यात आली आहे.वजन, डाटा एन्ट्री, पडताळणी, माल चढाई, वाहनतय आदी सेवा या नाक्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नाके बंद करण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवावी, नाके बंद झाल्यावर राज्य शासनावर किती भार पडेल, यासह काही मुद्द्यांच्या अभ्यासासाठी अभ्यासगट नेमला आहे. या अभ्यासगटाचा अहवाल येईपर्यंत संबंधित नाक्यांना मान्यता देण्यात येत असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. काहींच्यामते राज्य शासनाने पळवाट शोधून खासगी ठेकेदाराकरवी सक्तीची वसुली करण्याचा घाट रचला आहे.
लाचखोरी वाढणार
महासंघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक चेकपोस्टवर वजनकाट्यापोटी १८० रुपये घेतले जाणार आहेत. त्यानुसार नवापूर, भिलाडसह राज्यात अन्य तीन ठिकाणी वसुली सुरु झाली आह. या तांत्रिक पद्धतीतून लाचखोरी वाढणार आहे.१० किलो ते १०० किलोपर्यंतच्या ओव्हरलोड वाहनाला २२ हजारांचा दंड आकारला जातो. त्यामुळे दंडाची भिती दाखवून ट्रकचालकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे महासंघाच्यावतीने या निर्णयाविरोधात ‘चक्काजाम’ केले जाईल, असे गवळी यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"