जळगाव ते भुसावळ महामार्गावरील कालिका माता मंदिर चौकात रस्त्याच्या कामामुळे आधीच वाहतुक संथ गतीने सुरू आहे. त्यात चौकात समोरील बाजूस महामार्गालगत ठिकठिकाणी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या थाटल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रस्त्यावरील वाहतुक संथ गतीने सुरू असून, सायंकाळच्या सुमारास वर्दळ वाढल्यामुळे कोंडी उद्भवत आहे.
खोटे नगर स्टॉप
गेल्या दीड वर्षभरापासून या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे, वाहनधारकांना दररोज तारेवरची कसरत करित वाहन चालवावे लागत आहे. सध्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे प्रमाण वाढले आहे. कामामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णत : बंद आहे. परिणामी रस्त्यावर संथ गतीने वाहतुक सुरू असल्यामुळे खोटे नगर, शिवकॉलनी थांबा, अग्रवाल चौक या ठिकाणी कोंडीची समस्या उद्भवत आहे.
ममुराबाद नाका :
शिवाजीनगर परिसराला लागून असलेल्या ममुराबाद नाक्यावर अतिक्रमणामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. त्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहन चालवितांना प्रचंड धुळ उडत असल्यामुळे, चोपडा, यावल व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.