जळगाव जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर प्रत्येकी १०० कर्मचाऱ्यांना असे एकूण ९०० कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ असेल. लाभार्थी यांना दंडावर ही लस देण्यात येणार आहे. तसेच लसीकरण सत्र पाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. सुरुवातीला कोविन अॅपद्वारे १०० लाभार्थींची यादी तयार होऊन त्यांना एक दिवस आधी एसएमएसद्वारे कोविड लसची दिनांक, वेळ, ठिकाण कळविली जाईल. लसीकरणावेळी कर्मचाऱ्यांना नोंदणीच्या वेळी दिलेलं ओळखपत्र व आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
सॅनिटाइज करूनच प्रवेश
लाभार्थी कर्मचाऱ्यास केंद्रात सॅनिटाइज करूनच प्रवेश दिला जाणार आहे. त्यावेळी ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजनची पातळणी तपासली जाईल. त्यानंतरच लसीकरण कक्षात कर्मचाऱ्यास पाठविले जाईल.
महत्त्वाचे चार संदेश देण्यात येणार
कर्मचाऱ्यास दंडावर लस देण्यात आल्यानंतर त्यास चार महत्त्वाचे संदेश देण्यात येणार आहेत. त्यामध्ये त्यास कोणती कोविडची लस दिली. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाल्यास आशा, एएनएम किंवा आरोग्य केंद्र, कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, पुढील लसची दिनांक कळविण्याबाबत तसेच लस दिल्यानंतर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी या महत्त्वाचे संदेश देण्यात येणार आहे.
निरीक्षणाखाली ठेवले जाणार
लाभार्थी कर्मचाऱ्याला लस दिल्यानंतर त्यास निरीक्षण कक्षात पाठविले जाईल. त्याठिकाणी १ डॉक्टर व १ कर्मचाऱ्याच्या निरीक्षणाखाली त्या कर्मचाऱ्यास ठेवले जाणार आहे. जर लाभार्थीस काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधन सामग्री एईएफआय किट उपलब्ध असेल.