जळगाव: संचमान्यता २०२२-२३ नुसार अतिरिक्त ठरलेल्या १०० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन केले जाणार असून, त्याचे जळगाव जिल्ह्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्राप्त शाळा व संस्थांचा समावेश नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी दिली.
संस्थांना अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी दि. २३ ते दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळी कार्यवाही पूर्ण करायची आहे. जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने याचे सविस्तर वेळापत्रक तयार केले आहे. यामध्ये दि. २३ रोजी : शाळेत / संस्थेतील मंजूर, कार्यरत, रिक्त व अतिरिक्त पदांची संख्यात्मक माहिती तयार करायची आहे. दि. २५ : अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे संस्थांतर्गत समायोजन, दि. २६ : संस्थांतर्गत समायोजनानंतर जिल्हास्तर समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांची नावे जाहीर करणे, आक्षेपांवर सुनावणी, दि. २७ : जिल्हास्तर समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांची माहिती जिल्हास्तरावर सादर करणे, दि. ३० : जिल्हास्तरावर प्राप्त आक्षेपांची सुनावणी घेणे, दि. ३१ : जिल्हांतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे. एकापेक्षा जास्त खासगी प्राथमिक शाळा असल्यास संस्थांतर्गत समायोजनाची प्रक्रिया दि. २५ ऑक्टोबर रोजी पूर्ण करायची आहे. त्यानंतर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे जिल्हास्तरावरून रिक्त जागी समायोजन केले जाणार आहे. यातून जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची संख्याही समोर येणार आहे.