दीपनगर, ता. भुसावळ : दीपनगर येथे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात परवानगीच्या नावाखाली अतिरिक्त वृक्षतोड झाल्याची तक्रार आहे. यामुळे निसर्गप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दीपनगरमधील जुन्या भेलयार्ड, तापी नदी किनारी, जुन्या रेस्टहाऊसजवळील परिसरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची निर्मिती होत आहे. तेथील २०-२५ वर्षांच्या घेरदार वृक्षांची परवानगी घेऊन कापणी करण्यात आली. यात एक आंब्याचा वृक्ष, पाच निंब, पाच बेहडा, तीन वावडी, आठ निलगिरी, नऊ अडुसा अशा ३० झाडांची कापणी आणि इतर अतिरिक्त वृक्षांची तोड करून झाडे जागेवरून पसार करण्यात आली.
याबाबत लोकमत वार्ताहराने चौकशी केली असता त्यांच्याकडे ३० घेरदार झाडांची व ३० किरकोळ झाडांची कापणी करण्याची लेखी स्वरुपात परवानगी असल्याचे आढळले. परंतु ठेकेदाराने अतिरिक्त जास्त झाडे तोडून तेथून झाडे पसार केली आहेत. या वृक्षतोडीमुळे परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दररोज चार-पाच वृक्षांची तोड करण्यात येत असल्याने कापलेली सर्व झाडे एकाच ठिकाणी आढळत नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे.
...तर कारवाई करू
सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक झाडे कापल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. प्रकल्प परिसरात आम्ही नवीन झाडे लावून त्यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखू. या प्रकल्पामुळे २० मेगावॅट पाॅवरची निर्मिती होऊन परिसरात प्रदूषण कमी होईल व १०० बेरोजगारांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होईल. हा प्रकल्प उभारणीसाठी एक वर्ष लागेल.
-अमित खैरे, साईड इन्चार्ज, दीपनगर