जळगाव : रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासंदर्भात खासगी कंपन्यांशीही प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात ज्या कंपन्या रेमडेसिवीरचा पुरवठा करत आहे. त्याव्यतिरिक्त मायलॅन, प्रोटेक आणि फार्म डील या हिमाचल प्रदेशातील कंपन्यांशी जिल्हा प्रशासानाने स्थानिक डीलर्स मार्फत पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडे रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध असेल तर तो पुरवठा करण्याची विनंतीही जिल्हा प्रशासनाने या पत्रातून या कंपन्यांना केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ज्या कंपन्यांच्या माध्यमातून रेमडेसिवीरचा पुरवठा होत आहे. त्याव्यतिरिक्त इतर तीन कंपन्यांशी प्रशासनाने संपर्क साधला असून त्यांच्याकडून रेमडेसिवीर स्थानिक डिलर्सला मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यातून रुग्णांना रेमडेसिवीरची उपलब्धतता वाढु शकते, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
रेमडेसिवीरची अडचण कायम
सध्या जिल्ह्यातील रुग्णांना पुरेल एवढे रेमडेसिवीर उपलब्ध नाही. त्याची अडचण कायम आहे. त्याच्या वापरासंबधीचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाने बुधवारी दिले आहेत.