जळगाव : जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १५७ रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप प्रशासनाने केले आहे. त्यात बहुसंख्य लहान रुग्णालयांना प्रत्येकी एकच रेमडेसिविर देण्यात आले आहे, तर काही मोठ्या रुग्णालयांना सात किंवा आठ रेमडेसिविर देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत पोस्ट केली आहे. कोणत्या रुग्णालयाला किती रेमडेसिविर दिले आहे. याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. बहुसंख्य रुग्णालयांना प्रत्येकी फक्त एकच रेमडेसिविर देण्यात आल्याने अजून रेमडेसिविरची टंचाई कायम असल्याचे समोर आले आहे.
४७ रुग्णालयांना प्रत्येकी एक वायल
रेमडेसिविरची टंचाई गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. जिल्ह्यात काळ्या बाजारात ही औषधी उपलब्ध असल्याचे वारंवार समोर येत आहे. प्रशासनाने २७ एप्रिल रोजी वाटप केलेल्या रेमडेसिविरमध्ये ४७ रुग्णालयांना प्रत्येकी एकच रेमडेसिविरचे वायल देण्यात आले आहे. त्यात काही रुग्णालयांना दोन तर काही मोजक्या रुग्णालयांना सात किंवा आठ वायल्स देण्यात आल्याचे प्रशासनाने ट्विटरवरून प्रसिद्ध केलेल्या तक्त्यातून समोर आले आहे.