लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात आपत्तीची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये याकरीता प्रशासन उपाययोजना राबवित असून भविष्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षिततेचे सर्व उपाय तयार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून विविध यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्यावत करण्यात येऊन २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
धरणांची सुरक्षितता, पुररेषांची तपासणी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणांची सुरक्षितता, पुररेषा, धोक्याच्या पातळीतील वस्त्या यांची तपासणी करण्यात येण्यासोबतच जिल्ह्यातील पुलांची सुरक्षितता, धोकादायक पूल, शोध व बचावकार्य, साहित्याची सुस्थिती इत्यादी बाबींची खात्री करण्यात येत आहे.
अन्नधान्य व औषधांचा साठ्याचे नियोजन
पावसाळ्यात कोविड सेंटरच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारणे, वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरळीत राहील, आदिवासी भागात अन्नधान्याचा व औषधांचा साठा करुन ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा कार्यान्वित
गेल्यावर्षी पावसाळ्यात नदीपात्रात दोन महिला वाहून गेल्याने जिल्हा प्रशासनाने नाविण्यपूर्ण योजनेतून तापी नदीकाठच्या गावात बहुउद्देशीय आपत्कालीन डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रण कक्षात स्थापन करण्यात आली आहे. याद्वारे नागरिकांना महत्वाची सूचना व माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हतनूर धरणाखाली तापी नदीकाठच्या भुसवाळ, यावल, जळगाव व रावेर तालुक्यातील नदीच्या दोन्ही तीरावरील एकूण २५ गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यापूवी ३० मिनिटे अगोदर या २५ गावांना डिजिटल दवंडी सायरनद्वारे धोक्याची सूचना देऊन सतर्क करण्यात येणार आहे. यामुळे नागरिक सावध होऊन वित्त व जीवीत हानी टाळता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.