फोटो : ८.५४ वाजेचा मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कधी काळी जळगाव जिल्ह्यातील संसर्गाचा दर हा देशात सर्वाधिक असताना सर्वांच्या सहकार्याने आता आपला दर सर्वांत कमी झालेला आहे. आपण दुस-या लाटेचा प्रतिकार यशस्वीपणे केला असून, तिसरी लाट आलीच तर याच्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
मोहाडी येथील महिला रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे सोमवारी भूमिपूजन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. याच कार्यक्रमात हॉस्पिटलला १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट देण्यात आली असून, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तर कोरोना योद्ध्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण, सुभाष राऊत, जि. प. सदस्य पवन सोनवणे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, नशिराबाद येथील एका कंपनीने अजिंठा विश्रामगृहातील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद व जळगाव खुर्द या ठिकाणी प्रत्येकी दोन असे ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले. याप्रसंगी कंपनीचे एम. पी. जोशी, रोहित जोशी, मोनिया यादव, जळगाव खुर्द येथील उषा पाटील, विलास पाटील, ग्रामसेवक संजय देवरे, नशिराबादचे प्रशासक अर्जुन पाचवणे, ललित भोळे आदींची उपस्थिती होती.