लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला रविवारी सायंकाळी केंद्रीय समितीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी जे खासगी ङाॅक्टर रुग्णांची माहिती प्रशासनाला देत नसतील, प्रशासनाला मदत करत नसतील, अशा खासगी डाॅक्टरांना नोटीस द्या, अशा सूचना समितीच्या अधिकाऱ्यांनी येथील आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
या तपासणीतील त्रुटींचा अहवाल वरिष्ठांकडे समिती पाठवणार आहे. दरम्यान, अशा खासगी डाॅक्टरांना प्रशासनामार्फत नोटीस देण्यात येतील, अशी माहिती कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत पाटील यांनी दिली.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला रविवारी सायंकाळी केंद्रीय समितीने भेट देऊन पाहणी केली. येथे मृत्यूचे प्रमाण जास्त दिसत आहे. रुग्ण ताप, टायफाईड आदी आजाराने त्रस्त झाल्यावर खासगी डाॅक्टरांकडे ४ ते ५ दिवस औषधोपचार करतात. यावेळी रुग्णांची माहिती काही खासगी डाॅक्टर प्रशासनाला रोज न देता आपला व्यवसाय करतात. तसेच उपचारापूर्वी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाची कोविड चाचणी करण्यास खासगी डाॅक्टरांनी रुग्णाला सांगायला हवे. मात्र, त्यांच्याकडील रुग्णाला जेव्हा आजाराचा त्रास अधिक वाढतो, गंभीर स्थिती होते, मग असे रुग्ण खासगी डाॅक्टरांकडून शासकीय कोविड सेंटरला येतात. आजाराचे प्रमाण वाढल्याने व वेळीच उपचार न झाल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण सध्या वाढत आहे. हे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले.