जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात पाच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसवण्यास जिल्हा प्रशासनाने बुधवारी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. तसेच पाच प्रकल्प हे जिल्हा वार्षिक योजनेतून होणार आहेत. तर उर्वरित पाच प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
मोहाडी महिला रुग्णालय, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा आणि चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसवण्यास जिल्हा प्रशासनाने तांत्रिक मंजुरी दिली होती. त्याला बुधवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचे काही कोटेशन्स जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आले आहेत. ते आणि काही कोटेशन्स गुरुवारी प्राप्त होणार आहेत. त्यांचा अभ्यास करून गुरूवारीच या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे कार्यादेश दिले जाणार आहेत. यात प्रत्येक प्रकल्पाच्या ठेकेदाराला तीन वर्षांच्या देखभालीचे काम देखील दिले जाणार आहे.
हे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत यांनी त्याचे अंदाजपत्रक तयार केले. त्यानंतर त्याला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे.